
उपसंपादक :-मन्सूर तडवी
अंबरनाथ (पूर्व) येथील तहसील कार्यालयात कागदपत्रांवर सत्यप्रत (अटेस्टेड) करून देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयातच नागरिकांच्या कामांची हेळसांड होत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ मार्च २०२६ रोजी सौ. चंद्रा मुरलीधर भोईर या आवश्यक कागदपत्रांवर सत्यप्रत करून घेण्यासाठी अंबरनाथ तहसील कार्यालयात गेल्या होत्या. त्यांनी पॅनकार्ड, आधारकार्ड, BA.B.Ed. मार्कशीट तसेच शाळा सोडल्याचा दाखला (LC) आदी कागदपत्रांवर अधिकृत सही व शिक्का करून देण्याची विनंती संबंधित अधिकाऱ्यांकडे केली.
मात्र तहसील कार्यालयातील, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रांवर सत्यप्रत करण्यास स्पष्ट नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही अधिकाऱ्यांनी “आमच्याकडे शिक्का नाही” असे कारण दिले, तर काहींनी “आम्ही सत्यप्रत देऊ शकत नाही” असे सांगत काम टाळल्याचेही सांगण्यात आले.
सौ. भोईर या शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण, महिला आघाडी पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र प्रदेश संघटक, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था – ठाणे महिला उपाध्यक्ष तसेच जनसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश – ठाणे जिल्हा अध्यक्ष या पदांवर कार्यरत असून त्यांना अशा प्रकारे कार्यालयात हेलपाटे मारावे लागणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निदर्शनास आले आहे. नागरिकांची कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारे टाळाटाळ होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शिवतेज माहिती अधिकार पत्रकार महिला संघटनेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे यावेळी मोहिनी भालेराव कोकण विभाग अध्यक्ष. सविता गमरे महाराष्ट्र प्रदेश संघटक. चंद्रा भोईर अंबरनाथ तालुका आरटीआय उपाध्यक्ष गणेश भोईर उल्हासनगर तालुका अध्यक्ष. ज्योती शेळके उल्हासनगर तालुका संपर्कप्रमुख सायमा शेख डोंबिवली उपाध्यक्ष. सचिन दिवेकर उल्हासनगर उपाध्यक्ष गणेश ओमप्रकाश आणि ज्येष्ठ सल्लागार जाधव सर हे उपस्थित होते. भविष्यात नागरिकांना विनाकारण त्रास दिला गेला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवतेज संघटनेने दिला आहे.
या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.







