
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
साकळी ग्रामपंचायतीने गावात वाटप केलेल्या डसबिन संदर्भात आता गंभीर प्रश्न उपस्थित होत असून ग्रामपंचायत कारभाराच्या पारदर्शकतेवरच संशयाचे ढग जमा झाले आहेत. माजी ग्रामपंचायत सदस्य तथा साकळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन या डसबिन वाटपाच्या खर्चाचा जाब विचारत लेखी अर्ज दाखल केला आहे.
ग्रामपंचायतीकडून गावात मोठ्या प्रमाणात डसबिनचे वाटप करण्यात आले; मात्र
हे डसबिन कोणत्या निधीतून खरेदी करण्यात आले?
एकूण किती डसबिन वाटप झाले?
प्रत्येकी डसबिनची किंमत किती आहे?
ठराव, बिल, अंदाजपत्रक व मंजुरी कोणाची?
असे अनेक मूलभूत प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांनी आपल्या अर्जात स्पष्टपणे नमूद केले असून, ग्रामपंचायतीने केलेल्या प्रत्येक खर्चाचा हिशोब नागरिकांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सार्वजनिक निधीचा वापर होत असताना ग्रामपंचायतीने पूर्ण पारदर्शकता ठेवणे अपेक्षित असते; मात्र डसबिन वाटप प्रकरणात ही पारदर्शकता कुठेच दिसून येत नाही, असा आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नसून, त्यामुळे गावकऱ्यांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. लोकांच्या पैशातून खरेदी केलेल्या वस्तूंचा हिशोब मागणे जर चुकीचे असेल, तर योग्य काय? असा सवाल आता साकळीकर विचारत आहेत.
या प्रकरणी ग्रामपंचायतीने तात्काळ,खर्चाचा तपशीलखरेदीची कागदपत्रे, निधीचा स्रोत, ठरावांची प्रत
सार्वजनिक करावी, अन्यथा हे प्रकरण अधिक गंभीर वळण घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
साकळी ग्रामपंचायत या अर्जाची दखल घेते की नाही, तसेच खर्चाचा हिशोब जनतेसमोर मांडते की नाही, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले आहे.






