
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
साकळी गावात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून गावातील मुख्य व अंतर्गत भागातील गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. मात्र या संपूर्ण प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
गावातील अनेक वॉर्डांमध्ये महिन्यांपासून गटारी साफ करण्यात आलेल्या नाहीत. साचलेले सांडपाणी, कचरा, प्लास्टिक आणि घाण यामुळे रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. लहान मुले, वृद्ध व महिला यांना संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून डेंग्यू, मलेरिया,
टायफॉईडसारख्या आजारांची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्वच्छ भारत अभियानाच्या केवळ जाहिराती आणि फलक लावून प्रत्यक्षात मात्र गावाला नरकासमान अवस्थेत सोडण्यात आले आहे.
नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, लवकरात लवकर गटारी साफ न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा उद्रेक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.







