
उपसंपादक मिलिंद जंजाळे यांचा इशारा
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
साकळी येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेतील अंगणवाडीत लहान मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात दि. १२ जानेवारी रोजी चक्क आळी आढळून आल्याची धक्कादायक व संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, हा गंभीर प्रकार घडूनही संबंधित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वरिष्ठ कार्यालयास तात्काळ माहिती न देता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून थेट लहान बालकांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळ करण्याचा प्रकार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
निकृष्ट अन्नपुरवठा – ठेकेदारावर संशयाची सुई
या घटनेमुळे पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या कामकाजावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्यंत निकृष्ट, दूषित व अपायकारक अन्न पुरवले जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून अशा ठेकेदारामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उपसंपादक मिलिंद जंजाळे यांचे प्रशासनाला खडेबोल
या प्रकरणी दैनिक हॅलोचे उपसंपादक तथा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साहेबराव जंजाळे यांनी यावल येथील एकात्मिक महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करून जोरदार कारवाईची मागणी केली आहे.
त्यांनी मागण्या करताना म्हटले आहे की –
संबंधित ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करावा.
दोषी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर विभागीय चौकशी करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी.
साकळीतील सर्व अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तातडीने गुणवत्ता तपासणी करावी.
तसेच, “या प्रकरणात तात्काळ व कठोर कारवाई झाली नाही, तर पालकवर्ग व नागरिकांच्या साथीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रशासन गप्प – लोकांमध्ये संताप
या घटनेनंतरही संबंधित विभागाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गरीब व सामान्य कुटुंबातील लहान मुलांच्या जीवाशी असा खेळ सहन केला जाणार नाही, अशी तीव्र भावना गावकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
आता जिल्हा प्रशासन, एकात्मिक महिला बाल विकास विभाग आणि जिल्हा परिषद या प्रकरणाची किती गंभीर दखल घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







