
बीड : /प्रशांत बाफना शहरातील अंकुश नगर परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा दिवसाढवळ्या गोळीबार करून, त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे शांत असलेल्या बीड शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणाचे नाव हर्षद तुळशीदास शिंदे (वय अंदाजे ३० ते ३५) असे असून तो धानोरा रोड येथील हाउसिंग कॉलनीचा रहिवासी होता. हर्षद शिंदे हा बीड नगरपरिषदेत प्लंबर म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, अंकुश नगर परिसरात नगरपरिषदेच्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हर्षद शिंदे याच्यावर अचानक दोन वेळा गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर तो खाली कोसळला. त्यानंतरही हल्लेखोरानी त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने तोंडावर व शरीरावर वार करत अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
या हल्ल्यात हर्षद शिंदे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक पूजा पवार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल होते.
दरम्यान, हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी पिस्तुलीच्या दोन गोळ्या आढळून आल्या असून पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे.
फॉरेन्सिक प्रयोगशाळेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून तांत्रिक व सखोल तपास सुरू आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या गंभीर घटनेमुळे बीड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे







