
तालुका प्रतिनिधी: राहुल जयकर
ट्रान्सजेंडर अभ्यास व सामाजिक कार्य क्षेत्रातील उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण योगदानाबद्दल भुसावळ (महाराष्ट्र) येथील पारलिंगी सामाजिक कार्यकर्ता डॉ. चाँद जयबून बी. सरवर तडवी यांना मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate Award) प्रदान करण्यात आली आहे. हा सन्मान नालंदा NIRC युनिव्हर्सिटी (Global Honorary Research Institution), पंजाब यांच्या वतीने २५ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला.
डॉ. तडवी यांनी ट्रान्सजेंडर समुदायाच्या सांस्कृतिक परंपरा, ओळख, सामाजिक परिवर्तन तसेच समकालीन प्रश्नांवर सखोल अभ्यासपूर्ण कार्य केले आहे. यासोबतच समाजसेवेतील त्यांचे समर्पित व सातत्यपूर्ण योगदान लक्षात घेऊन नालंदा NIRC युनिव्हर्सिटीने हा गौरव प्रदान केल्याचे नमूद करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, निष्ठा आणि समाजहितासाठी दिलेल्या सेवेचा गौरव म्हणून ही मानद डॉक्टरेट देण्यात आल्याचे विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या सन्मानामुळे ट्रान्सजेंडर अभ्यास व सामाजिक कार्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या संशोधक, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांना नवी प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया विविध सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे.
डॉ. चाँद तडवी यांच्या या गौरवामुळे ट्रान्सजेंडर समुदायाचे हक्क, अस्मिता आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.







