
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
अडावद ग्रामपंचायतीत शासन निधीची उघड लूट आणि नियमांना हरताळ फासणारा कारभार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्य जुनेद खान मुन्सफ खान पठाण यांनी थेट जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्फोटक तक्रार दाखल करत सरपंच, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यावर संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यालाच ठेका नियम धाब्यावर
दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत अडावद अंतर्गत शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या रफिक शेख तय्यब मनियार याच्या नावाने ३५,००० व १०,००० रुपये असे एकूण ४५,००० रुपयांचे बिल थेट अदा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी असताना त्यालाच कामाचा ठेका देणे हे सरळसरळ बेकायदेशीर असून हा प्रकार उघड भ्रष्टाचार असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सरपंच–ग्रामसेवक–कर्मचारी संगनमत
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमत करून शासनाच्या पैशांची उधळपट्टी केली असून ही रक्कम नियमबाह्य पद्धतीने अदा करण्यात आली.
हा प्रकार म्हणजे ग्रामपंचायतीतील भोंगळ आणि मग्रूर कारभाराचे जिवंत उदाहरण असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीला केराची टोपली, उलट धमकी
या प्रकरणी दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार देऊन माहिती मागितली असता, ग्रामसेवकांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
इतकेच नव्हे तर, “तुला जिथे जायचे असेल जा, मी बघून घेईल” अशी उद्धट व धमकीवजा भाषा वापरल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे.
तात्काळ निलंबन व चौकशीची मागणी
तक्रारीत स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की,संबंधित शिपाई कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून कमी करावे.सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची सखोल चौकशी करावी.
दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी कारवाई नाही तर आमरण उपोषणाचा इशारा योग्य कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य जुनेद खान पठाण यांनी दिला आहे.
“ही केवळ आर्थिक गैरव्यवहाराची बाब नसून शासनाच्या पैशांवर केलेला उघड डल्ला आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.प्रशासन काय भूमिका घेणार?या प्रकरणात आता जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात? दोषींवर कारवाई होणार की पुन्हा प्रकरण दडपले जाणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







