
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
साकळी ग्रामपंचायतीत लोकशाहीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रीमती खान नूर तस्लिम खान यांनी कोऱ्या कागदावर घेतलेल्या अंगठ्याच्या ठशाचा गैरवापर करून बनावट राजीनामा तयार होण्याची ठाम शंका व्यक्त केली आहे.
या प्रकरणी त्यांनी ग्रामपंचायत साकळी तसेच यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
तक्रार अर्जात उपसरपंच खान यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे की,
मी आजपर्यंत उपसरपंच पदाचा कोणताही लेखी अथवा तोंडी राजीनामा दिलेला नाही. माझ्या संमतीशिवाय व मला कोणतीही माहिती न देता कोऱ्या कागदावर विश्वासाने घेतलेल्या अंगठ्याच्या ठशाचा फसवणुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने वापर होण्याची दाट शक्यता आहे.
उपसरपंच खान यांनी पुढे म्हटले आहे की,माझे सर्व व्यवहार अंगठ्याच्या ठशावरच चालतात. याचाच गैरफायदा घेत पूर्वी वेगळ्या कारणासाठी घेतलेल्या कोऱ्या कागदावरील अंगठ्याच्या ठशावर नंतर राजीनाम्याचा मजकूर टाकून बनावट दस्तऐवज तयार केला जाऊ शकतो.हा प्रकार अत्यंत गंभीर, फसवणूक करणारा व पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले आहे. भविष्यात माझ्या नावाने दाखल होणारा कोणताही राजीनामा माझ्या इच्छेविरुद्ध असून तो अमान्य व अवैध समजावा, अशी स्पष्ट मागणी त्यांनी अर्जात केली आहे. माझी प्रत्यक्ष उपस्थिती, ओळख पडताळणी व लेखी पुष्टी घेतल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये, असेही त्यांनी प्रशासनाला बजावले आहे. तसेच दिलेल्या तक्रार अर्जाची ग्रामपंचायत दप्तरी तात्काळ नोंद घेऊन भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
या धक्कादायक प्रकरणामुळे साकळी ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लोकप्रतिनिधींच्या अंगठ्याच्या ठशांचा गैरवापर होत असेल तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
आता प्रशासन काय भूमिका घेते? दोषींवर कारवाई होणार की प्रकरण दाबले जाणार?
याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







