
धान्य गरिबांसाठी की जनावरांसाठी | संतप्त रेशनधारकांचा पुरवठा विभागाला सवाल | वाळकी गणातील गावांमधील प्रकार
अहिल्यानगर | प्रशांत बाफना
शासनाकडून नागरिकांना मिळणार्या रेशन धान्यात मोठ्या प्रमाणात सोनकिडे, कचरा, बारीक चुर निघत असल्याने हे धान्य जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे. वाळकी गणातील लाभार्थ्यांना रेशन धारकांकडून या धान्याचे वितरण झाले असून, नागरिकांच्या आरोग्याच्या जिवाशी पुरवठा विभाग खेळत असल्याने लाभार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल बहिरट यांनी दिला आहे.
जल्ह्यातील गोरगरिब, दारिद्रयरेषेखाली असणार्या नागरिकांना केंद्र शासनाकडून अंत्योदय योजनेतून महिन्याला ३५ किलोंचे धान्य मोफत मिळते. यात गहू व तांदुळ याचा समावेश असतो. केंद्र शासनाकडून मिळणार्या या धान्याचे वितरण राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत केले जाते. धान्य वितरण प्रणाली व लाभार्थ्यांना धान्य योग्य प्रमाणात मिळते की नाही, याची सर्व जबाबदारी जिल्हा पुरवठा विभागावर आहे.
दर महिन्याला सर्व रेशन दुकानदारांकडून धान्याचे वाटप करण्यात येते. या महिन्यात वाळकी गणातील गावांमध्ये रेशन धान्याचे वाटप करण्यात आले असून, हे धान्य निकृष्ट प्रतीचे असल्याने लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तांदुळ व गव्हाला सोनकिडे लागले आहे. धान्याची बारीक चूर झाली असल्याने हे धान्य खायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. निकृष्ट प्रतीचे धान्य देऊ त्यांची चेष्टा चालविली आहे. रेशन दुकानदारांकडे तक्रार करून धान्य बदलून मिळाले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते बहिरट यांनी पुरवठा विभागावर संताप व्यक्त केला आहे. खराब धान्याचा पुरवठा बंद करून चांगले धान्य द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.







