
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
एकट्या भाजपाकडून १५० हून अधिक जैन उमेदवार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक, प्रत्येक महापालिकेत भाजपाचा भगवा फडकवण्याचा निर्धार
व्यापार, उद्योग, सहकार, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात देशाला दिशा देणारा जैन समाज आता राजकारणातही निर्णायक व नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी पूर्णतः सज्ज झाला आहे. संकटाची वेळ असो वा नैसर्गिक आपत्ती, जैन समाजाने नेहमीच तन-मन-धनाने समाजसेवेत पुढाकार घेतला आहे. देशाच्या जीडीपीमध्ये भरीव योगदान देणारा हा समाज आता संघटितपणे राजकारणात उतरून आपली ताकद दाखवत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपा जैन प्रकोष्ठाचे प्रदेशाध्यक्ष श्री. संदीप भंडारी यांनी केले.
जैन समाज हा भारतीय जनता पक्षाचा पारंपारिक, विश्वासू व विचारांशी बांधील मतदार राहिला आहे. २०२१ मध्ये तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात देशात प्रथमच भाजपा जैन प्रकोष्ठाची स्थापना करून जैन युवकांना राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले. या प्रकोष्ठाच्या प्रदेशाध्यक्षपदी संदीप भंडारी यांची नियुक्ती झाल्यानंतर अल्पावधीतच राज्यभर हजारो जैन समाजातील सामाजिक कार्यकर्ते भाजपाशी जोडले गेले आणि भाजपा जैन प्रकोष्ठ एक मजबूत, शिस्तबद्ध व प्रभावी संघटन म्हणून उभे राहिले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा जैन प्रकोष्ठाच्या कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर प्रभावी कामगिरी करत जैन समाजातील मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या वाढवला. या यशानंतर आता आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक महापालिकेत भाजपाचा भगवा फडकवण्याचा ठाम संकल्प जैन समाजाने केला आहे.
अखिल भारतीय अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ललित गांधी व भाजपा जैन प्रकोष्ठाचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांच्या नेतृत्वाखाली एकट्या भाजपाकडून १५० हून अधिक जैन कार्यकर्ते महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. जैन समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर संघटित व आक्रमक राजकीय सहभाग पाहायला मिळत असून, ही बाब येणाऱ्या निवडणुकांत निर्णायक ठरणार आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठाने मागील ८ महिन्यांपासून नियोजनबद्ध व व्यापक निवडणूक तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी महापालिका-निहाय कोअर कमिट्या जाहीर करण्यात आल्या असून, प्रत्येक प्रभागात जैन समाजाची प्रभावी राजकीय उपस्थिती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जैन समाज तन-मन-धनाने भाजपाच्या पाठीशी उभा राहून महापालिकांमध्ये भाजपाला अधिक बळकट करेल, असा ठाम विश्वास संदीप भंडारी यांनी व्यक्त केला.
भाजपाने नेहमीच जैन समाजाच्या हितासाठी ठाम भूमिका घेत ठोस निर्णय राबवले आहेत. “जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ” ची स्थापना व निधीची तरतूद, मरीन ड्राईव्ह येथे जैन जिमखान्यासाठी अडीच एकर भूखंड, भगवान महावीर २५५० वा निर्माण कल्याणक महोत्सव प्रथमच राज्यस्तरावर साजरा करणे, मुख्यमंत्री जेष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजनेत १२ जैन तीर्थस्थळांचा समावेश, गोमातेला ‘राज्यमाता’ घोषित करणे व गोवंशासाठी प्रतिदिन ₹१०० अनुदान यांसारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे जैन समाजाचा विश्वास भारतीय जनता पक्षावर अधिक दृढ झाला आहे.
युती सरकारने व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण व विकासाभिमुख निर्णयांमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये जैन समाज महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि महापालिकांमध्ये भाजपाला स्पष्ट व भक्कम जनादेश मिळेल, असा विश्वास जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी व्यक्त केला.







