
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. राज्यभरात ५ नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवत, तसेच ५५ नगरसेवक निवडून आणत वंचित बहुजन आघाडीने आपली संघटनात्मक ताकद आणि जनाधार पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध केला आहे.
हा विजय केवळ आकड्यांचा नाही, तर बहुजन समाजाच्या हक्क, स्वाभिमान आणि परिवर्तनाच्या लढ्याचा बुलंद आवाज आहे. उपेक्षित, वंचित, शोषित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या स्पष्ट भूमिकेला जनतेने मतदानातून ठोस कौल दिला असल्याचे या निकालांवरून स्पष्ट होते.
प्रस्थापित पक्षांना धक्का, नव्या राजकीय समीकरणांची नांदी
परंपरागत प्रस्थापित पक्षांचे बालेकिल्ले हादरवत वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी निर्णायक विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या पदांवर वंचितच्या उमेदवारांचा विजय म्हणजे स्थानिक सत्ताकेंद्रात बहुजन नेतृत्वाची ठाम पायाभरणी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’चा कौल
वंचित बहुजन आघाडीने मांडलेली सामाजिक न्याय, समानता, पारदर्शक प्रशासन आणि विकासाची बहुजनदृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. त्यामुळेच नगरसेवकांच्या रूपाने मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नेते निवडून आले असून, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचितचा आवाज अधिक बुलंद होणार आहे.
राज्याच्या राजकारणात निर्णायक वळणास सुरुवात झाली आहे.
५ नगराध्यक्ष आणि ५५ नगरसेवकांचा हा दणदणीत विजय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचे वाढते महत्त्व अधोरेखित करणारा आहे. येणाऱ्या काळात हा विजय विधानसभेपासून लोकसभेपर्यंत नव्या राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारा ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचा हा विजय म्हणजे बहुजन समाजाच्या राजकीय सशक्तीकरणाचा ऐतिहासिक टप्पा ठरत असून, राज्याच्या राजकारणात परिवर्तनाची नवी पहाट उगवली आहे.







