
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल–बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेली बिनधास्त वृक्षतोड ही नॅशनल हायवे विभागातील अभियंत्यांच्या आशीर्वादानेच होत असल्याचा गंभीर आरोप आता उघडपणे समोर येत आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी ही वृक्षतोड नेमकी कोणाच्या परवानगीने सुरू आहे, याचा जाब विचारला असता संबंधित अभियंतेच जबाबदारी टाळत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
या संदर्भात नॅशनल हायवे विभागातील अभियंता गायकवाड यांच्याशी संपर्क साधून वृक्षतोडीसाठी आवश्यक असलेली अधिकृत परवानगी (ऑर्डर) मागितली असता, त्यांनी थेट उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. “हे काम जुने आहे”, “फक्त झाडांची शाटन (फांद्या कापणे) करण्यास सांगितले होते” अशी गोलमोल माहिती देत त्यांनी मूळ मुद्द्यालाच बगल दिली.
प्रत्यक्षात मात्र महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. फक्त शाटन करण्याचे आदेश असतील, तर सरसकट झाडे जमीनदोस्त कशी केली जात आहेत? याचे ठोस उत्तर देण्यास अभियंते अपयशी ठरले. यावरून वृक्षतोडीच्या गंभीर विषयाकडे अभियंता वर्ग किती बेफिकिरीने पाहतो, हे स्पष्ट होते.
पर्यावरण संरक्षणाचे नियम, न्यायालयीन निर्देश, वनविभागाची परवानगी याबाबत कोणतीही स्पष्टता न देता “काम जुने आहे” अशी सबब देणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या नावाखाली निसर्गाचा बळी दिला जात असताना जबाबदार अधिकारीच गांभीर्य दाखवत नसतील, तर हा प्रकार अधिक संशयास्पद ठरतो.
यावल–बऱ्हाणपूर मार्गावरील वृक्षतोड तात्काळ थांबवून संबंधित अभियंत्यांकडून लेखी परवानगी आदेश सार्वजनिक करावेत, अन्यथा ही वृक्षतोड बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे.
पर्यावरणाशी खेळणाऱ्यांना मोकळे रान देणारे अधिकारी नेमके कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत?
हा प्रश्न आता संपूर्ण यावल तालुक्यात ऐरणीवर आला आहे.







