
अहिल्यानगर | प्रशांत बाफना
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सोशल मीडियाच्या गैरवापराला रोखण्यासाठी तोफखाना पोलिसांनी कंबर कसली आहे. प्रभारी अधिकारी जगदीश भांबळ यांनी सर्व सोशल मीडिया ग्रुप अॅडमिन आणि सदस्यांना कडक इशारा देणारी नोटीस बजावली आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात प्रतिबंधक आदेश लागू केले आहेत. कोणत्याही उमेदवाराची वैयक्तिक बदनामी करणे, फोटोंशी छेडछाड (मॉर्फिंग) करून ते प्रसारित करणे किंवा जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठवणे हा आता गंभीर गुन्हा ठरणार आहे.
विशेषतः व्हॉट्सअॅप ग्रुपवर चुकीचा मजकूर आल्यास केवळ पाठवणाराच नाही, तर ग्रुप अॅडमिनलाही कायद्याच्या कचाट्यात धरले जाईल. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारे स्टेटस ठेवल्यास थेट न्यायालयीन कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मतदान १५ जानेवारी आणि मतमोजणी १६ जानेवारीला होणार असून, तोपर्यंत सोशल मीडियावरील प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष राहणार आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.







