
निवडणूक विभागाची जय्यत तयारी, मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
यावल नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ (ब) मधील लोकशाही प्रक्रियेला नवे बळ देणारा मोठा निर्णय निवडणूक विभागाने घेतला आहे. विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या प्रभाग ८ (ब) मधील मतदारांना पुन्हा एकदा मतदानाचा पवित्र हक्क मिळणार असल्याने परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
लोकशाहीच्या बळकटीसाठी कटिबद्ध असलेल्या निवडणूक विभागाने या पुनर्मतदानासाठी जय्यत तयारी केली असून मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा, सुरक्षा व्यवस्था, अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोणताही गोंधळ होऊ नये, पारदर्शक व निर्भय वातावरणात मतदान व्हावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक ८ (ब) मधील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, “आता आमचा आवाज पुन्हा मतपेटीतून उमटणार” अशी भावना मतदार बोलून दाखवत आहेत. राजकीय पक्षांमध्येही या पुनर्मतदानामुळे हालचालींना वेग आला असून प्रचाराला नवे चैतन्य मिळाले आहे.
लोकशाहीतील प्रत्येक मत महत्त्वाचे असते, हे अधोरेखित करणारा हा निर्णय यावल नगरपरिषदेच्या निवडणूक इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. आता सर्वांचे लक्ष मतदानाच्या दिवशी प्रभाग ८ (ब) मधील जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागतो, याकडे लागले आहे.







