
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार व हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या अत्यंत गंभीर व अमानुष घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण तसेच माहिती अधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात संघटनेच्या वतीने यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी विजय संजय खैरनार यास कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून समाजात दहशत निर्माण होऊन भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे.
संघटनेने निवेदनात नमूद केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे या प्रकरणात जलदगती न्यायालयात खटला चालवून तात्काळ निकाल लावण्यात यावा. तसेच शासन व प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून व्यापक जनजागृती करावी, जेणेकरून भविष्यात अशा अमानवी घटना रोखता येतील.
या मागणीसाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी, प्रदेशाध्यक्ष श्री. रंगनाथ मोरे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी निवेदनावर सह्या करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
डोंगराळे, मालेगाव किंवा नाशिक पुरतेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अशोक तायडे (तालुका अध्यक्ष), गणेश पाटील (कार्याध्यक्ष), सागर कोळी (तालुका उपाध्यक्ष), रुपेश कोळी (युवा संघटक), लक्ष्मी मेढे (महिला तालुका अध्यक्ष) यांच्यासह यासीन तडवी, तुषार पाटील, शरद तायडे, चंद्रकांत चौधरी, ललित चोपडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.







