
2018 मध्ये तीन महिने शेवगावात लपून वास्तव्य
अहिल्यानगर/प्रशांत बाफना
भारतीय नागरिकत्व व्यवस्थेलाच आव्हान देणाऱ्या गंभीर प्रकरणात शेवगावातून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चार बांगलादेशी नागरिकांनी भारतीय असल्याचा बनाव करून पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. हा प्रकार उघडीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे
क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, पुणे यांना दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी संशयास्पद प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अहिल्यानगर पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले. त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांना सखोल चौकशीचे आदेश दिले.
चौकशीत शुओ कोनक मुस्तुडी, राजु सिद्धार्थ चौधरी, जेलो प्रियतोश चौधरी व प्रकाश सुनिल चौधरी या चौघांनी सन 2018 मध्ये शेवगाव शहरात सुमारे तीन महिने वास्तव्य करून शासकीय कार्यालयात भारतीय नागरिक असल्याचा बनावट पत्ता व कागदपत्रे सादर केल्याचे स्पष्ट झाले. या चौघांकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही वैध पुरावा नसल्याचे निष्पन्न झाले.
चौकशी अहवाल दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी सादर झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोपींकडील पासपोर्ट क्रमांक —
S0437573, S0436971, S0456498 व S1710723 — तपासात जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 420, 465, 468, 471 तसेच भारतीय पासपोर्ट अधिनियम 1967 चे कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार शेवगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष हरिभाऊ वाघ यांनी केली.
या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर अशा बनावट कागदपत्रांच्या जाळ्याचा संशय बळावला असून, यामागे कोणाचे हात आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास अधिक वेगाने सुरू आहे







