
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
नाशिक येथील तपोवन परिसरात हजारो वृक्षांची तोड करून शासन नेमके काय सिद्ध करू पाहत आहे, असा संतप्त सवाल आज पर्यावरणप्रेमी, निसर्गवादी आणि जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत. तपोवनातील वृक्षतोड म्हणजे केवळ झाडे कापणे नव्हे, तर लाखो माणसांच्या श्वासावर घाला घालण्यासारखा गंभीर गुन्हा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
एक वृक्ष जगवण्यासाठी किती वर्षांची मेहनत, काळजी आणि निसर्गाचा आशीर्वाद लागतो, हे कधी एखाद्या खऱ्या वृक्षप्रेमीला विचारले आहे का? मात्र शासनाच्या निर्णयामुळे हे सर्व एका झटक्यात उद्ध्वस्त केले जात आहे. नाशिक शहराला स्वच्छ हवा, संतुलित हवामान आणि नैसर्गिक सौंदर्य देणारे तपोवनातील वृक्ष आज विकासाच्या नावाखाली निर्दयपणे जमीनदोस्त केले जात आहेत.
तपोवन हे केवळ एक भूभाग नाही, तर नाशिकच्या पर्यावरणीय संतुलनाचा कणा आहे. येथील झाडे-झुडपे, जैवविविधता आणि हिरवळ यामुळेच तपोवनाला एक वेगळी ओळख लाभली आहे. अशा या निसर्गसंपन्न परिसराचा नयनाट करून शासन कोणता विकास साधू इच्छित आहे, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे थेट मानवी जीवनावर आघात आहे. लाखो नागरिकांना प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची कत्तल करून शासन भविष्यातील पिढ्यांचे आयुष्य धोक्यात घालत आहे. हे कृत्य केवळ निषेधार्ह नाही, तर कठोर शिक्षेस पात्र असल्याची भावना पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र होत आहे.
जर आज या वृक्षसंहाराला आळा घातला गेला नाही, तर उद्या नाशिकला श्वास घेणेही कठीण होईल. पर्यावरणाचा बदला निसर्ग स्वतः घेतो, आणि अशा शासनाला निसर्गकडून कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.







