
साईबाबा संस्थांनच्या सुरक्षा रक्षकाची कर्तव्यनिष्ठा; १० हजार डॉलर्स व पासपोर्ट सापडताच मूळ मालकाला केला परत
शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
श्री साईबाबांच्या मंदिरात आज माणुसकी आणि प्रामाणिकतेचा एक अत्यंत अनुकरणीय प्रसंग समोर आला आहे. साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्याने एका अमेरिकन भक्ताची हरवलेली १० हजार अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनात अंदाजे ९ लाख रुपये) असलेली बॅग तत्परतेने परत करून कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज मंदिरात श्री साईबाबांची धूप आरती संपल्यानंतर मंदिराच्या मागील परिसरात सुरक्षा कर्मचारी श्री. कृष्णा कुलकर्णी यांना एक बेवारस बॅग आढळून आली. बॅग मिळताच त्यांनी तात्काळ आसपासच्या साईभक्तांकडे चौकशी केली, मात्र कोणीही मालक न मिळाल्याने त्यांनी ती बॅग तातडीने संरक्षण कार्यालयात जमा केली.
सुरक्षा विभागाने बॅगेची तपासणी केली असता, त्यामध्ये १० हजार यूएस डॉलर्स आणि एक पासपोर्ट आढळून आला. पासपोर्टवरील ‘मोहित धवन’ (रा. अमेरिका) या नावाच्या आधारे मंदिर परिसरात त्वरित अनाउन्समेंट करण्यात आली. काही वेळातच संबंधित साईभक्त मोहित धवन यांनी संरक्षण कार्यालयात धाव घेतली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी योग्य ती पडताळणी करून रोकड आणि पासपोर्ट त्यांना सुपूर्द केला.
आपली गहाळ झालेली बॅग आणि त्यातील मोठी रक्कम सुखरूप परत मिळाल्याने मोहित धवन यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांनी श्री साईबाबा संस्थानचे विशेष आभार मानले असून, संस्थेच्या चोख सुरक्षा व्यवस्थेचे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे मनापासून कौतुक केले आहे.
वरिष्ठांकडून कौतुक,
सुरक्षा कर्मचारी श्री. कृष्णा कुलकर्णी यांनी दाखविलेली तत्परता, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा पाहून संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर सुरक्षा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी, साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. श्री साईबाबा संस्थानची सुरक्षा टीम भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या वस्तूंच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.







