
नाभिक समाजाचा विराट मूक मोर्चा; निषेधार्थ दिवसभर दुकाने ठेवली बंद
कासोदा/एरंडोल (प्रतिनिधी: शेख जावीद) –
सटाणा तालुक्यातील खामटाणे गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. येथील नाभिक समाजातील अवघ्या ९ वर्षीय चिमुरडीवर एका ७० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला. या घृणास्पद घटनेचे तीव्र पडसाद जळगाव जिल्ह्यात उमटले असून, या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी बुधवारी एरंडोल येथे नाभिक समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात आला.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ (एरंडोल शहर व ग्रामीण) आणि कासोदा नाभिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सटाणा येथील घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असली, तरी या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागून त्यास फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बुधवारी सकाळी ११ वाजता नाभिक समाजाच्या मढीवरून या मूक मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा पांडववाडा, मारवाडी गल्ली, आठवडे बाजार परिसरातून म्हसावद नाक्यामार्गे एरंडोल उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये समाजातील महिला आणि पुरुषांचा मोठा सहभाग होता.
मोर्चानंतर आंदोलकांनी नायब तहसीलदार प्रवीण भिरव यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर हा मोर्चा एरंडोल पोलीस स्टेशनवर गेला, तिथे पोलीस निरीक्षकांनाही (PI) निवेदन सादर करण्यात आले. या घटनेचा निषेध म्हणून एरंडोल तालुक्यातील नाभिक बांधवांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
या आंदोलनात जळगाव जिल्हा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ गांगुर्डे, एरंडोल ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र ठाकरे, तालुका उपाध्यक्ष देवराम सोनवणे, एरंडोल दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गजानन गांगुर्डे, उपाध्यक्ष किरण बोरसे, सचिव सुनील महाले, निळकंठ अहिरे, गणेश गांगुर्डे, रवींद्र बोरसे, दशरथ पवार, राजेंद्र सोनवणे, समाधान निकम, पुंडलिक गांगुर्डे, भरत फुलपगार, रवींद्र कुवर, गणेश महाले, विठ्ठल वसाने, सुधाकर सोनगिरे, तळई येथील छोटू भाऊ सोनवणे, पत्रकार सुरेश ठाकरे उपस्थित होते.
तसेच कासोदा येथून शहराध्यक्ष विनोद ठाकरे, उपाध्यक्ष अजय निकम, सचिव बंटी ठाकरे, राजेंद्र ठाकरे, वसंत सोनवणे, गोपाल देवरे, बाळा सोनवणे यांच्यासह असंख्य महिला भगिनी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







