जळगाव | प्रतिनिधी
शिवाजीनगर, अमन पार्क, तवक्कल किराणा, शिवशक्ती मंदिर परिसरातील नागरिकांना सध्या अतिशय गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने वाहतूक करणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी स्वतःच्या खर्चाने वेस्ट मटेरियल टाकून रस्ता सुधारण्याचा प्रयत्न केला असता देखील ट्रॅक्टर रस्त्यातच फसले! ट्रॅक्टर बाहेर काढताना स्थानिकांनी हालअपेष्टा सहन केल्या, मात्र प्रशासन अजूनही झोपेतच आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील महापालिकेने कोणतीही दखल घेतलेली नाही. “आम्ही स्वतःच्या पैशाने रस्ता सुधारणाचा प्रयत्न करतो, तरीही मनपा मदतीस धावून येत नाही, मग आम्ही जगायचं तरी कसं?” असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
या भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, चिखल आणि नाल्यांचे पाणी साचल्याने दररोजच्या जीवनात अडथळे निर्माण होत आहेत. शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि रुग्णवाहिकांना याचा मोठा त्रास होत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असूनही स्थानिक प्रशासन मात्र केवळ आश्वासनाच्या पातळीवरच आहे.
प्रशासनाला जाग येणार कधी?
शहराचा हा भाग वारंवार दुर्लक्षित का राहतो? नागरिकांचा प्रश्न आहे, की वारंवार तक्रारी करूनही जर उपाययोजना होत नसतील तर मग लोकशाहीत प्रशासनाचा उपयोग काय?
संपूर्ण रस्ता डागडुजी करावी, नियमित देखभाल करावी आणि नागरिकांच्या प्रश्नांना गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी जोरकसपणे केली आहे. अन्यथा, लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.