
अहिल्यानगर / प्रशांत बाफना
केडगाव उपनगरातील हजारे मळा परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी असून, वनविभागाकडून याठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
केडगावमधील शाहूनगर पसिरातील बायपास जवळ शेतकऱ्यांची शेती आहे. हजारे मळा याठिकाणी सकाळी पप्पू हजारे हे शेतातील ऊस तोडत होते. त्यांचा पाळीव कुत्रा हा उसाच्या शेतात शिरला अन् जीव वाचविण्याच्या भितीने अचानक बाहेर भुंकत जोरात पळत आला. त्यामुळे हजारे घाबरले. ऊसाच्या आतमध्ये बिबट्या असल्याचा संशय आल्याने ते तेथून घाबरून निघून आले. याची माहिती त्यांनी स्थानिक नागरिकांसह नगरसेवक अमोल येवले यांना दिली.
येवले यांनी तातडीने वनविभागाला माहिती कळविली. वनविभागाचे कर्मचारी सकाळी या भागात आले. यावेळी नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. हजारे मळा भागात ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यातून या भागात बिबट्या आहे की नाही, हे समजणार आहे. वनविभागाकडून खबरदारी म्हणून या भागात पिंजरा लवण्यात येणार आहे. दुसरीकडे केडगावात बिबट्या आल्याची माहिती समजताच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
कामरगाव येथे लावले पिंजरे
अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव येथे विठ्ठलवाडी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी पिंजरे बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष (अजित पवार गट) सिद्धांत आंधळे यांनी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली. त्यांनी त्याची दखल घेऊन डी.पी.डी.सी. अंतर्गत वनविभागाला तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार कामरगाव येथील विठ्ठलवाडी परिसरात अत्याधुनिक पिंजरा तातडीने बसविला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे, मा.सरपंच तुकाराम कातोरे, आदिनाथ आंधळे, वनकर्मचारी सखाराम येणारे, वनरक्षक कृष्णा गायकवाड, योगेश चव्हाण आदी उपस्थित होते.







