
रावेर प्रतिनिधी आदित्य गजरे
रावेर गुन्हे शोध पथकाने अल्पावधीतच सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत दोन सराईत चोरांना अटक केली असून तब्बल २,५०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रावेर पोलिस स्टेशन येथे दि. ०१/१२/२०२५ रोजी गुन्हा क्र. ४७४/२०२५ भा.न्या. संहिता कलम ३०४ (२) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
फिर्यादी सौ. शोभाबाई सुरेश पाटील, वय ४७, रा. वाघोड या दि. ०१/१२/२०२५ रोजी दुपारी ३ वाजता कर्जीत फाटा येथे उतरून वाघोडकडे पायी जात असताना स्मशानभूमीसमोर दोन इसम लाल-काळ्या रंगाच्या बजाज पल्सरवर आले. वाट विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या चेहऱ्यावर माती फेकली व गळ्यातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (पोत) बळजबरीने ओरबाडून पळ काढला. त्यावरून रावेर पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.त्या दिवशी रावेर शहरात निवडणुकीची तयारी सुरू असताना घडलेली ही गंभीर घटना समजताच पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला घटनास्थळी रवाना केले. परिसराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले; जरी आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी त्यांच्या हालचाली, वाहनाचा प्रकार आणि शरीरयष्टी यावरून त्यांचा संभाव्य मार्ग शोधण्यात आला.यानंतर सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड), तांत्रिक माहिती, लोकल नेटवर्क आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी रावेर शहरात बराच वेळ रेकी करून वाघोडकडे गेले असल्याचे निष्पन्न झाले. त्याच आधारे गुन्हे शोध पथकाने आरोपींची ओळख पटविण्यात यश मिळवले.

तांत्रिक माहितीवरून आरोपींचे वास्तव्य अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) असल्याचे समोर आले. पथक तेथे पोहोचल्यावर आरोपी फरार असल्याचे कळले. पीआय जयस्वाल यांनी पथकाला तेथेच तळ ठोकून आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. पथकाने अंतुर्ली गावालगतच्या शेतात तंबू ठोकून पाहणी सुरू ठेवली.
काही तासांनंतर आरोपी गावात आल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ कारवाई केली. पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी नरवेल–मुक्ताईनगर रोडने पल्सरवरून पळून जात होते; मात्र शर्थीचा पाठलाग करून दोघांना जेरबंद करण्यात आले.अटक आरोपी —
(१) अजय गजानन बेलदार, वय २० (२) नरेंद्र उर्फ निलेश अशोक बेलदार, वय २०
दोघेही रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव
चौकशीत आरोपींनी दि. ०३/११/२०२५ रोजी कुर्हा–काकोडा बसथांब्यावरून १० ग्रॅम सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली असून त्या संदर्भात मुक्ताईनगर दुरक्षेत्रात गुन्हा क्र. ३३५/२०२५ दाखल आहे.जप्त मुद्देमाल —
- गुन्ह्यात वापरलेली विना नंबर प्लेटची बजाज पल्सर – ₹ ७५,०००/-
- १३.३०४ ग्रॅम सोन्याचे दागिने – ₹ १,७५,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल – ₹ २,५०,०००/-आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींना मा. न्यायालयात हजर करून दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव; मा. श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव विभाग; मा. श्री अनिल बडगुजर, उपअधीक्षक फैजपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल, पो.उप.नि. तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.शि. विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, विकार शेख, भुषण सपकाळे, अतुल गाडीलोहार यांचा मोलाचा सहभाग होता. तांत्रिक माहिती सायबर पोलीस स्टेशनचे मिलिंद जाधव व गौरव पाटील यांनी उपलब्ध करून दिली. पुढील तपास पो.उप.नि. तुषार पाटील करीत आहेत.







