
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
सांगवी बु II, ता. यावल: ज्योती विद्यामंदिर व ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही “गांधी विचार संस्कार परीक्षा” उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून गांधीजींच्या विचारांविषयीचे आपले ज्ञान आणि कुतूहल प्रकट केले.
दिनांक 28 नोव्हेंबर 2025, शुक्रवार रोजी झालेल्या या परीक्षेचे आयोजन फाउंडेशनचे समन्वयक श्री. गिरीश कुलकर्णी व श्री. चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शाळेतील परीक्षा समन्वयक म्हणून श्री. व्ही. व्ही. धनके सर आणि सौ. एम. एस. ताडेकर मॅडम यांनी संपूर्ण परीक्षेचे नियोजन, शिस्तबद्ध कामकाज जबाबदारीने पार पाडले.
या परीक्षेत शाळेतील एकूण 72 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून गांधीजींच्या विचारसरणीविषयीचे आपले गाढ प्रेम आणि अभ्यासू वृत्ती दाखवून दिली. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी जवळपास दोन महिने आधी गांधीजींच्या जीवनावर आधारित पुस्तक अभ्यासासाठी दिले जाते. व त्यावर आधारित गांधी विचार संस्कार परीक्षा घेण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी फक्त अभ्यासच करत नाहीत तर गांधीजींच्या विचारधारेचा गांभीर्याने विचार करतात.
दरवर्षीच्या प्रमाणे यावर्षीही प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक जाहीर करण्यात येणार असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय, नैतिक मूल्यांचा अंगीकार आणि चांगल्या विचारांची जडणघडण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
या महत्त्वपूर्ण परीक्षेच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. भंगाळे, पर्यवेक्षक श्री. सी. पी. फिरके, श्री. पी. एम. भंगाळे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे घेतली जाणारी ही परीक्षा शाळेच्या वार्षिक शैक्षणिक प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, शिस्त, आत्मविश्वास, विचारमंथन आणि सामाजिक भान वाढवण्यासाठी असा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे पालक व शिक्षक दोघांचेही मत आहे.







