
*गावासाठी गौरवास्पद बाब
*गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गावात प्रभावीपणे वृक्षारोपण व संगोपन या क्षेत्रात साकळी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साकळी ग्रामपंचायतचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला.व्यापक वृक्षारोपण उपक्रमात लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करून तालुक्यात आदर्श निर्माण केलेला असून या कामाची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
जळगाव येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सभागृहात दि.२२ नोव्हें.२०२५ रोजी आयोजित केलेल्या सन्मान सोहळा कार्यक्रमात राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जळगाव जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच दिपक पाटील व ग्राम रोजगार सेवक विशाल पाटील यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
साकळी गावात सरकारी दवाखाना,प्राथमिक व माध्यमिक शाळा,देवस्थान परिसर,सार्वजनिक ठिकाणे,स्मशानभूमी,शेतशिवार रस्ते-बांध यासह गावात ठिकठिकाणी सरपंच दिपक पाटील,उपसरपंच नूर बी तस्लीम खान,ग्रामपंचायत सदस्य आणि ग्राम रोजगार सेवक,ग्रामंस्थ यांच्या पुढाकाराने वर्ष – दोन वर्ष वयाच्या मोठ्या वृक्षांचे व्यापक असे वृक्षारोपण करण्यात आले आहे.वृक्षांची केवळ लागवड न करता त्यांच्या संगोपनावर विशेष भर देण्यात येत असते.त्यामुळेच या उपक्रमाला जिल्हास्तरावर विशेष बहुमान मिळाला आहे.गावातही वृक्षारोपण मोहिमेला नागरिकांनी वेळोवेळी उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे. तेव्हा गावातील व्यापक वृक्षारोपण मोहिमेमुळे गाव- परिसराचे भविष्यातील पर्यावरण संतुलन राखण्यास खूप मोठी मदत होणार आहे.सदर वृक्षारोपण मोहिमेचा जिल्हास्तरावर सन्मान झाल्याने साकळी गावाच्या गौरवात आणखी एक भर पडली आहे.







