
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील मारूळ गावात वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणाने हद्द पार केली आहे. गावातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी असलेली उघडी वीज वितरण पेटी (डीपी) आता अक्षरशः मृत्यूचे खुले आमंत्रण देत उभी आहे. शाळा, अंगणवाडी, आयुर्वेदिक दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय आणि बसस्थानकाच्या शेजारीच असलेली ही धोकादायक डीपी ग्रामस्थांच्या जीविताशी थेट खेळ खेळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
झाकण नाही, कंपाउंड नाही — वीज विभागाचे डोळे झाक!
डीपीचे झाकण पूर्णपणे निघाले असून आजूबाजूस कंपाउंडचा कुठलाही मागमूस नाही. जमिनीपासून अवघ्या 2–3 फूट उंचीवर उघडी वीज यंत्रणा, आणि त्या भोवती खेळणारी मुले — ही परिस्थिती किती जीवघेणी आहे याची जाणीवच विभागाला नसल्याचे स्पष्ट दिसते.
“ही डीपी म्हणजे भलताच सापळा आहे. एखाद्या मुलाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
कट-आउटऐवजी सरळ तार निष्काळजीपणाची पराकाष्ठा!
या धोकादायक परिस्थितीवर अधिक भर म्हणजे कट-आउटच्या ऐवजी सरळ जोडलेली वीज तार! कोणताही सुरक्षा नियम न पाळता केलेली ही व्यवस्था थेट अपघातांना आमंत्रण देणारी आहे.
वीज वितरण विभागाने मानवी जीवाची किंमत शून्य केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सिंगल फेजवरच वीजपुरवठा विकास थांबलेला, समस्या कायम!
ग्रामस्थांनी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून गावात थ्री-फेज कनेक्शनच दिले जात नाही.
पूरा गाव आजही सिंगल फेजवरच चालतो, त्यामुळे वीजपुरवठा अस्थिर, वारंवार खंडित आणि कमी क्षमतेचा राहतो.
नुसती पाहणी करून जातात, कारवाई मात्र शून्य!
गावकऱ्यांनी आरोप केला की वीज विभागाचे अधिकारी फक्त येतात, पाहणी करतात आणि रिकाम्या हाताने परत जातात. ना झाकण बसवले जाते, ना कंपाउंड, ना वायरिंग दुरुस्ती!
“एखादा अपघात होण्याची वाटच पाहताहेत का?” असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांचा इशारा — उपाय न झाल्यास मोठे आंदोलन
ग्रामस्थ आणि पालकांनी स्पष्ट चेतावणी दिली आहे
डीपीला तत्काळ झाकण बसवावे
सुरक्षित कंपाउंड उभारावे
धोकादायक वायरिंग तात्काळ दुरुस्त करावी
गावात थ्री-फेज वीजपुरवठा सुरू करावा
अन्यथा, मारूळ गाव आंदोलकांनी संतप्त आंदोलन उभारले जाईल, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
आता प्रश्न एकच
मानवी जीव महत्त्वाचा की विभागाची निष्क्रियता?
मारूळ गावातील परिस्थिती पाहता वीज वितरण विभागाचे गंभीर दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येते.
एकीकडे ‘सुरक्षित वीजपुरवठा’चे आश्वासन देणारे अधिकारी, आणि दुसरीकडे उघडी, जीवघेणी डीपी — यातील विसंगती मात्र ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ करीत आहे.
आता तरी विभाग जागा होणार का?
की आणखी एखादा अपघात होईपर्यंत कारवाई होणारच नाही?
ग्रामस्थांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या या गंभीर प्रकरणात तातडीची कारवाई होणे अत्यावश्यक आहे.







