
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. देशाच्या सर्वोच्च कायद्याची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती उमेश कवडी वाले, नर्सिंग स्टाफ, आशा गटवर्तक,आशा वर्कर्स, आरोग्य सेवक, प्रशासकीय कर्मचारी अशा सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. “We The People of India…” या अभिमानाने भरलेल्या शब्दांमुळे परिसर देशभक्तीने भारून गेला. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समता आणि न्यायाची तत्त्वे यांची उजळणी करून दिली.
यावेळी आरोग्य कर्मचारी यांनी लोकशाही, सामाजिक न्याय आणि मानवतावादी मूल्यांचे संवर्धन करण्याची शपथ घेतली. तसेच आरोग्यसेवेच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच आपले कर्तव्य असल्याचे सर्वांनी नमूद केले.
कार्यक्रमात स्वच्छता अभियान, रक्तदाब–मधुमेह तपासणी शिबिर, आरोग्य जनजागृती यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करून संविधान दिन अधिक अर्थपूर्ण करण्यात आला.
वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की,
“संविधान फक्त एक दस्तऐवज नाही, तर भारताची प्रेरणा आहे… आणि आरोग्यसेवा ही त्या संवैधानिक मूल्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्याचा आणि नागरिकसेवा अधिक प्रभावी करण्याचा दृढ संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







