
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक पायाला मोठा जबर धक्का बसला आहे. अनेक वर्षे पक्षनिष्ठेने कार्य करत आलेले यावल शहर काँग्रेसचे अध्यक्ष अनिल नीलकंठ जंजाळे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतल्याचे समजते.
अनिल जंजाळे यांच्या प्रवेशासोबतच त्यांच्या पत्नी सौ. लता अनिल जंजाळे यांनीही काँग्रेसचा निरोप घेत भाजपचा झेंडा हातात घेतला आहे. विशेष म्हणजे, भाजपात प्रवेश होताच प्रभाग क्रमांक 4 मधून नगरपरिषद निवडणुकीसाठी लता जंजाळे यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांनी निवडणूक रिंगणात जोरदार पाय रोवले आहेत.
अनिल जंजाळे यांचा भाजपात प्रवेश हा केवळ एका कार्यकर्त्याचा पक्षांतर नसून काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. जंजाळे दाम्पत्याने गेल्या अनेक वर्षांत काँग्रेससाठी केलेल्या कार्यामुळे त्यांची निष्ठा आणि जनसंपर्क दोन्ही मजबूत मानले जात होते. त्यांच्या जाण्यामुळे स्थानिक काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपने जंजाळे दाम्पत्याचे जोरदार स्वागत करत यावल नगरपरिषद निवडणुकीत ‘मोठा गेम’ झाल्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारी वाटपातील गोंधळ आणि दुर्लक्षामुळे आणखी काही कार्यकर्ते पक्षांतराची शक्यता वर्तवली जात आहे.
या घडामोडींमुळे यावल नगरपरिषद निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून प्रभाग 4 मध्ये आता लढत रंगतदार होणार हे निश्चित आहे.







