
जळगाव : एमआयडीसीतील आर. एल. चौफुली परिसरातील ‘एन’ सेक्टर मध्ये असलेल्या आर्यव्रत केमिकल कंपनीला शुक्रवार (दि. 14) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता लागलेली आग काही मिनिटांतच भीषण रूप धारण करत संपूर्ण परिसराला हादरवून गेली. काही क्षणांतच ज्वाळांनी कंपनीतील मोठ्या प्रमाणात असलेले रासायनिक आणि औद्योगिक साहित्य भस्मसात केले. प्राथमिक अंदाजानुसार लाखोंचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका, जैन इरिगेशन, भुसावळ, जामनेर, नशिराबाद आणि वरणगाव येथील अग्निशामक दलांनी तातडीने मदत करत जवळपास 40 ते 50 अग्निशामक बंबांच्या सहाय्याने सलग प्रयत्न सुरू ठेवले. दुपारी दीड वाजेपर्यंत परिसरात दाट धूराचे लोट उसळत होते.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, ज्वाळा आणि काळा धूर तब्बल 4 ते 5 किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट दिसत होता, ज्यामुळे घटनेचे भीषण स्वरूप अधोरेखित झाले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात शॉर्टसर्किट हा आगीचा संभाव्य कारण असल्याचे सांगितले. तसेच, आमदार राजूमामा भोळे यांनीही तत्काळ भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
सुदैवाने, या प्रचंड आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, झालेल्या नुकसानीचा तपशील अद्याप समोर येणे बाकी आहे. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून, परिसरात सतत तणावाचे वातावरण आहे.







