
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने देशी दारू पाजल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी शिरसाड गावातील दोन तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता बी.एन.एस. 2023 कलम 173(2), कलम 351(2), कलम 351(3), अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 कलम 77 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत कलम 83 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरलीधर केदार भालेराव यांनी यावल पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की,
दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता त्यांचा मुलगा दीपेश (वय 14) हा आपल्या मित्रांसोबत घोडा-गाडी घेऊन मनवेल येथे लग्न सोहळ्यासाठी गेला होता. लग्नानंतर घरी परत येत असताना साकळी गावातील शारदा विद्या मंदिर शाळेजवळ दीपेश याच्या ओळखीचा गौरव (रा. शिरसाड) याने त्यास ट्रॅक्टरसाठी डिझेल आणण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर बसवले व त्यास साकळी गावाबाहेरील यावल-चोपडा रोडवरील साई धाब्यावर नेले.
तेथे गौरव याच्यासोबत असलेल्या अमोल उर्फ मयूर (रा. शिरसाड) या दोघांनी मिळून दीपेश यास जबरदस्तीने देशी दारू पाजली. त्यानंतर मुलाला दारूच्या नशेत साकळी येथील सरकारी रुग्णालयाजवळ सोडून दिले. दुपारी 2 वाजता दीपेश घरी आल्यावर त्याचा तोल जात असल्याचे पाहून वडिलांनी चौकशी केली असता त्याच्याकडून दारूचा वास येत होता.
त्यानंतर वडिलांनी तातडीने दीपेश यास स्वप्नील सोनवणे (रिक्षाचालक) यांच्या मदतीने यावल पोलिस स्टेशन येथे आणले व त्यानंतर ग्रामीण रुग्णालय यावल येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर शुद्धीवर आल्यावर दीपेशने संपूर्ण प्रकार सांगितला.
या घटनेनंतर यावल पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपी गौरव व अमोल उर्फ मयूर (रा. शिरसाड) यांच्या विरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिस निरीक्षकांकडून सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने दारू पाजल्याबद्दल नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
पोलिसांचे आवाहन :
अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत प्रत्येक पालकांनी जागरूक राहावे, तसेच समाजात अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.







