
(प्रतिनिधी: अमोल खरात)
जामनेर: तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेशी संबंधित असलेले राजकुमार कावडिया यांचा जळगाव येथे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे सुत्रांकडून माहित झाले आहे.त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या पळसखेडा येथील प्रकाशचंद जैन संस्थेवर प्रशासनाकडून कारवाई होणार होती. मात्र त्या कारवाईच्या अवघ्या २४ तास आधीच राजकुमार कावडिया यांच्या मृत्यूची घटना घडल्याने या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, राजकुमार कावडिया यांनी विषारी औषधाचे सेवन केले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. तथापि, त्यांच्या नातेवाईकांनी हा दावा फेटाळून लावत सांगितले की,
“त्यांना रात्रीपासून अस्वस्थपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.”
या परस्परविरोधी विधानांमुळे त्यांच्या मृत्यूभोवतीचे संशयाचे वातावरण अधिक गडद झाले आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, जामनेर तालुक्यातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकुमार कावडिया हे समाजातील सक्रिय आणि कार्यशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
सध्या पोलीस तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण काय.?पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.







