
पुणे, ७ नोव्हेंबर २०२६: महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना जोडणारे अग्रगण्य बिझनेस नेटवर्किंग व्यासपीठ GMBF Global (दुबई) तर्फे महाबीज २०२६ या प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषद व प्रदर्शनाची घोषणा शुक्रवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत डॉ. जितेंद्र जोशी, डॉ. सुनील मांजारेकर, विवेक कोल्हटकर, दिपाली गडकरी, नितिन सास्तकर, श्री अशोक सावंत यांच्या वतीने करण्यात आली आहे. या उपक्रमाला ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (GIBF) या भारतातील वेगाने वाढणारे आंतरराष्ट्रीय बिझनेस चेंबर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या निमित्ताने महाराष्ट्रभर विशेष रोडशो आयोजित केला जाणार आहे. यात महाबीज २०२६ च्या ९व्या आवृत्तीची माहिती, पूर्व-संवाद सत्रे आणि बिझनेस मॅचमेकिंगच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना सहभागी करून घेतले जाईल. महाबीज २०२६ हा कार्यक्रम दुबई येथे ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “Contacts to Contracts” या संकल्पनेवर आधारित होणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्र, मध्य पूर्व आणि आफ्रिका या प्रदेशांतील व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्य वाढविणे हा आहे. GMBF Global हे गेल्या दशकभरापासून कार्यरत असलेले स्वयंसेवी व्यासपीठ असून, दर महिन्याला शेकडो व्यावसायिक संपर्क आणि नवीन संधी निर्माण करते. GIBF हे १५० हून अधिक देशांतील दूतावास आणि वाणिज्य दूतावासांशी जोडलेले असून, विविध क्षेत्रांतील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (SMEs) जागतिक संधी उपलब्ध करून देत आहे.
महाबीज २०२६ मध्ये १५ पेक्षा अधिक देशांतील ८०० हून अधिक उद्योजक सहभागी होण्याची अपेक्षा असून, हा उपक्रम जागतिक स्तरावरील भागीदारी, निर्यात आणि गुंतवणुकीसाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल असा विश्वास देखील डॉ. जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केला.







