
अहिल्यानगर।प्रशांत बाफना
गेल्या काही वर्षात पत्रकारिता क्षेत्रामध्ये तोतया पत्रकारांची मोठ्या प्रमाणात खोगीर भरती झाली आहे. अर्थातच तोतया पत्रकारांचा बुजबुजाट झालेला दिसून येत आहे. हे तोतया पत्रकार मोठ्या प्रमाणावर राजकीय नेते असो की कार्यकर्ते, अधिकारी असो की कर्मचारी या सर्वांसमोर आर्थिक लाभासाठी अक्षरशः थयथयाट करू लागल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर असे तोतये पत्रकार शासन-प्रशासनावर आपल्या रुबाबाचा मेळ सुद्धा जमवू लागल्याने समाजात पत्रकारांविषयी नकारात्मक भावना निर्माण होऊ लागली आहे. मात्र जे खरे पत्रकार आहेत, ज्यांना समाजाच्या प्रश्नांची जाण आहे, जे इमानेइतबारे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. असे पत्रकार या तोतया पत्रकारांचा हा सर्व खेळ उघड्या डोळ्यांनी पहात आहेत.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले जाणारे पत्रकारिता क्षेत्र गेल्या काही वर्षात फोफावलेल्या सोशल मीडियामुळे अगोदरच मेटाकुटीस आले आहे. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या संपादकांसमोर सोशल मीडिया सोबत स्पर्धा करून आपले वृत्तपत्र चालविणे आता पहिल्यासारखे सोपे राहिलेले नाही. अगोदरच वाढलेल्या महागाईमुळे वृत्तपत्रासोबत जोडलेल्या सर्वांनाच महागाईच्या मानाने मानधन देणे संपादकांना जमेनासे झाले आहे. यामुळे चांगले कर्तबगार, कर्तव्यतत्पर, समाजाच्या प्रश्नांची जाण असलेले, आपल्या लेखणीतून दीनदलित, गोरगरीब, आर्थिक दृष्ट्या पिचलेल्या, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आघाडीवर राहणाऱ्या पत्रकारांना आवश्यक तेवढे मानधन देऊ शकत नसल्याने संपादकांसह विविध पदांवर असलेले वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. तरीसुद्धा खरे हाडाचे पत्रकार अशा स्थितीत ही आपल्या पेशाशी आणि समाजाशी जुळलेली आपल्या कर्तव्याची नाळ तुटू देत नाहीये.
एकीकडे असे खरे इमानदार पत्रकार असताना दुसरीकडे मात्र याच पत्रकारिता क्षेत्रात अनेक तोतया संपादक, कार्यकारी संपादक, उपसंपादक, पत्रकार म्हणून मिरवत असून ते खऱ्या इमानदार पत्रकारांपेक्षा आर्थिक लाभ घेण्यात दोन पावलंच काय चांगलेच आघाडीवर आहेत. असे अनेक तोतया पत्रकार हे शासकीय-प्रशासकीय कार्यालयात दिवसभर हिंडत राहतात. नेत्यांच्या बंगल्यांवर किंवा कार्यालयांवर सुद्धा यांची रेलचेल असते. ती यासाठीच की, या लोकांकडून आपल्याला बऱ्यापैकी धनलक्ष्मी मिळावी. हा एकमेव हेतू त्यांच्या मनात असतो. ते साध्य करण्यासाठी यांचे इकडून तिकडे अन् तिकडून इकडे सतत फिरणे सुरूच असते. यासाठी अशा तोतया पत्रकारांना जास्त काही खस्ता खाव्या लागत नाहीत. फक्त कोणत्यातरी एखाद्या वृत्तपत्राचे ओळखपत्र गळ्यात अडकविले की ते पत्रकार म्हणून तोंड वर करत फिरायला मोकळे असतात. खऱ्या व इमानदार पत्रकारांपेक्षा अशा तोतया पत्रकारांची आर्थिक स्थिती आणि तेही कोणत्याही वृत्तपत्रात बातमी किंवा लेख काय दोन ओळी सुद्धा न लिहिता चांगली आहे. अशांची आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी यांच्या अशा वागण्यामुळे वृत्तपत्रांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. वृत्तपत्र शेत्र बदनाम होऊ लागले आहे. या परिस्थितीला कारणीभूत असे तोतये पत्रकार आहे.
कारवाई करणे गरजेचे
गैरमार्गाने आर्थिक लाभ मिळविण्यासाठी नाना क्लुप्त्या करून फिरणाऱ्या तोतया पत्रकारांवर कडक कारवाई करणे गरजेचे झाले असून पत्रकारिता क्षेत्राला बदनाम होण्यापासून वाचविण्याकरिता असे पाऊल उचलणे अत्यंत आवश्यक आहे.
माहिती कार्यालय व माहिती अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
पत्रकारिता क्षेत्रात चालणारे वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक व प्रतिनिधींची माहिती, माहिती अधिकारी यांनी माहिती कार्यालयात देण्याची सक्ती करणे आवश्यक झाले आहे. वृत्तपत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकृत प्रतिनिधींची नावे, त्यांची पदे, त्यांचे छायाचित्र अशा माहितीची यादी माहिती कार्यालयात असायलाच हवी. जेणे करून असे तोतये आम्ही पत्रकार आहोत म्हणून पत्रकारिता क्षेत्राला बदनाम करत फिरू शकणार नाहीत. म्हणून या अशा तोतया पत्रकारांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मोहीम माहिती कार्यालय आणि माहिती अधिकाऱ्यांनी हाती घेणे आवश्यक आहे.
अन्यथा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ढासळायला वेळ लागणार नाही
सोशल मीडिया पाठोपाठ तोतया पत्रकारांमुळे वृत्तपत्रे अगोदरच डबघाईला आलेली आहेत. पत्रकारिता क्षेत्र अनेक संकटांना तोंड देत आहे. याकडे जर शासकीय-प्रशासकीय स्तरावर वेळीच लक्ष देण्यात आले नाही तर लोकशाहीचा हा चौथा आधारस्तंभ ढासळायला वेळ लागणार नाही. यामुळे वेळीच पाऊल उचलणे गरजेचे आहे.







