
पिंपरीनांदू शिवारात वाळू ट्रॅक्टर पलटी; एक ठार, एक जखमी
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :
मजुरीसाठी गेलेल्या तरुणावर अकाली काळाने झडप घातली. वाळू ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॉलीखाली दबल्याने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही हृदयद्रावक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरीनांदू शिवारात सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास तापी नदीकाठी घडली.
फिर्यादी सलीम शाह करीम शाह (वय ३९, रा. पिंपरीनांदू) यांनी मुक्ताईनगर पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, तोहीत शाह इस्माईल शाह हा चुलत भाऊ मजुरीसाठी नदीकाठी गेला होता. ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून परत येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन कलंडले.या भीषण अपघातात तोहीत शाह (वय २१) हा ट्रॉलीखाली दबल्याने जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेला अनिकेत संदीप इंगळे (वय २०) हा गंभीर जखमी झाला आहे. नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तोहीतला मृत घोषित केले.ही दुर्घटना मोहन कुंभार यांच्या विटभट्ट्याजवळ घडली. मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.







