
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साकळी-मनवेल गणात राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून निलोफर जहाँ शेख अन्वर या इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. महिला सर्वसाधारण राखीव गणात निलोफर जहाँ यांचे नाव चर्चेत असून, त्यांच्या उमेदवारीमुळे या गणात चुरशीची निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत.
निलोफर जहाँ या साकळी येथील सुप्रसिद्ध राजकीय कुटुंबातील असून, त्यांचा राजकीय वारसा लक्षणीय आहे. त्या जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अन्वर हाजी शे. रऊफोद्दीन यांच्या पत्नी आहेत. तसेच गावाचे माजी उपसरपंच पै. हाजी शे. रऊफोद्दिन हाजी शे. शफीयोद्दीन यांच्या सून आहेत. या दोन्ही पिढ्यांनी स्थानिक व जिल्हास्तरावर ठसा उमटवला आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे.
निलोफर जहाँ या उच्चशिक्षित, अभ्यासू, मनमिळावू आणि समजूतदार व्यक्तिमत्त्व असून, त्यांना घरातील राजकीय वारशामुळे बालपणापासूनच राजकारणाची जाण आहे. गावपातळीवरील समस्या, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे अभ्यासपूर्ण विचार आहेत. त्यांची थेट संवाद साधण्याची शैली आणि जमिनीवरचे कार्यकर्ते यामुळे त्यांचा संपर्क गावागावांमध्ये वाढत आहे.
सध्या त्या पक्षाकडून अधिकृत उमेदवारीसाठी प्रयत्न करत असून, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्कात आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या उमेदवारीमागे स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा असून, प्रचाराची रणनीती आणि मतदारांशी संवाद सुरू झालेला आहे.
पै. हाजी शे. रऊफोद्दिन यांच्या समाजकार्यातून उभा राहिलेला विश्वास आणि शेख अन्वर यांची अल्पसंख्यांक आघाडीतली भूमिका – या सर्व बाबी निलोफर जहाँ यांना बळकटी देत आहेत. त्यामुळेच त्यांचे नाव जाहीर झाले, तर साकळी-मनवेल गणातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
पक्षाकडून लवकरच अधिकृत उमेदवारी जाहीर होणार असल्याचे संकेत असून, निलोफर जहाँ यांचे नाव यामध्ये आघाडीवर असल्याचे पक्षांतर्गत सूत्रांकडून कळते. त्यामुळे साकळी-मनवेल गणातील राजकीय समिकरणे आता अधिक रंगतदार व रोचक होणार यात शंका नाही.







