
आदिवासी युवा नेत्याची उमेदवारी चर्चेत
यावल प्रतिनिधी : राहुल जयकर
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोणा–सावखेडा गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या गटात आदिवासी युवा नेते तसेच भीम आर्मी भारत एकता मिशन चे जळगाव जिल्हा सचिव आणि ग्रामपंचायत सदस्य फिरोज अब्बास तडवी यांनी उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे.
फिरोज तडवी हे पंच कमिटी अध्यक्ष, माजी शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच आदिवासी एकता मंच चे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. मागील काही वर्षांपासून त्यांनी समाजकारण, आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी संघर्ष आणि जनहिताच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
ग्रामीण भागात शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी तरुणांमध्ये संघटन व सामाजिक जागृती निर्माण करण्याचे काम केले आहे. या कार्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर मजबूत जनाधार मिळाला असून गटातील तरुण मतदारवर्ग त्यांच्याकडे आशेने पाहत आहे.
फिरोज तडवी म्हणाले, “आमच्या भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, शिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण करणे हेच माझे प्रमुख ध्येय आहे. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी राजकीय सहभाग आवश्यक आहे.”
हिंगोणा–सावखेडा गटात यंदा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाल्याने अनेक नवीन चेहरे पुढे येत असून, ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारा युवा नेता म्हणून फिरोज तडवी यांचे नाव गटात ठळकपणे पुढे येत आहे.







