जळगाव, दि. १३ जून २०२५ – जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात प्रशासनाच्या शिस्तीला हरताळ फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण मॅडम यांनी दिनांक १३ जून रोजी एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी ऑफिसमधील तब्बल ७ कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कार्यालय सोडल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांमध्ये ३ उपशिक्षण अधिकारी, १ लिपिक, २ शिपाई आणि एक OS अधिकारी यांचा समावेश होता. सर्व कर्मचारी व स्वतःशिक्षणाधिकारी मॅडम सोबत एका नामांकित परिसरात एका खासगी कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यामुळे कार्यालय पूर्णपणे रामभरोसे होते, कोणतीही अधिकृत परवानगी अथवा बदल अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नव्हता.
या घटनेमुळे जळगांव जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिस्त व कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासकीय कामकाज चालू असताना कार्यालयीन वेळेत एवढ्या संख्येने कर्मचारी खासगी कार्यक्रमासाठी घेऊन जाणे हे पूर्णपणे बेकायदेशीर व निष्काळजीपणाचे लक्षण मानले जात आहे.
शासनाच्या नियमांनुसार कोणताही अधिकारी खासगी कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचार्यांना कार्यालयीन वेळेत घेऊन जाऊ शकत नाही. यामुळे जनतेच्या कामांना खोळंबा झाला असून, कार्यालयात आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.
या प्रकाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता शिक्षण क्षेत्रातील संघटना व जनतेकडून होत आहे.
हा प्रकार केवळ शासकीय कामकाजातील हलगर्जीपणा नसून, अधिकाराचा दुरुपयोग देखील मानला जातो. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून कारवाई करणे अपेक्षित आहे.