
(प्रतिनिधी:अमोल खरात)
जामनेर: शहरामध्ये वाहनात गॅस भरत असतांना गॅस हंड्यांचा मोठा स्फोट झाला असून यात एक जण गंभीर जखमी तर एका शेळीचा मृत्यू झाला आहे.
विना परवाना ब्लॅक मध्ये वाहनात गॅस भरत असतांना शहरातील बोदवड रस्त्यावर सकाळी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास मोठा स्फोट झाला.
या घटनेत एक व्यक्ती तिथं या अपघातामध्ये सापडला असता तो गंभीर जखमी झाला असून त्याच वेळेत तिथं जवळचं फिरत असलेली एका शेळीचा जागीच मृत्यू झाला आहे.
अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असुन भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड रस्त्यावरील सलीम शेख यांच्या गॅरेजमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे समजते. सकाळच्या सुमारास वाहनांमध्ये गॅस भरत असतांना गॅस लिकेज होऊन सात ते आठ गॅस हंड्यांचे मोठे स्फोट झाले. या स्फोटांच्या धक्क्याने ओमनी कार आणि दुचाकी जळून खाक झाल्याचे दिसून आले. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
या दुर्घटनेत परिसरात असलेली एक शेळी होरपळून जागीच मृत झाली. घटनेनंतर नागरिकांनी तातडीने जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले.
तसेच जामनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी करून माहिती घेतली.
हे गॅरेज मोकळ्या जागेत असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेची नोंद जामनेर पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे.







