
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील(वढोदा प्र. यावल) : वढोदा गावात १९६५ सालापासून नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला जात आहे. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावात फक्त एकच दुर्गा देवीची स्थापना केली जाते. त्यामुळे “एक गाव, एक देवी” या उपक्रमातून गावातील ऐक्य, श्रद्धा आणि परंपरेचे दर्शन घडते.
गेल्या सुमारे ४० वर्षांपूर्वी स्व. नारायण आप्पा सोनवणे व गावकऱ्यांच्या पुढाकारातून ही परंपरा सुरु झाली. आजही जय दुर्गा मित्र मंडळ व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होऊन नवरात्र महोत्सव साजरा करतात. नऊ दिवस सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा-अर्चा, आरत्या, नवसपूर्ती विधी अत्यंत भक्तिभावाने पार पडतात. या काळात गावात एक आगळं-वेगळं नवचैतन्य अनुभवायला मिळते.
धार्मिक कार्यक्रमांसोबतच मंडळाच्या वतीने सांस्कृतिक, धार्मिक व जनजागृतीपर कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्यामुळे उत्सव केवळ भक्तीपुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीही जपतो.
या उत्सवातील खास आकर्षण म्हणजे शिरागड येथील श्री सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरातून अखंड पायी ज्योत आणण्याची परंपरा. सुमारे ५० ते ५५ युवक पायी चालत ही ज्योत वढोदा येथे घेऊन येतात. ही ज्योत यात्रा ही परंपरा भविष्यातही अखंड ठेवण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केला आहे.
कै. नारायण आप्पा सोनवणे व नामदेव तुकाराम चौधरी यांनी दुर्गामातेची मूर्ती गावकऱ्यांना अर्पण केली. कै. रामा बाविस्कर, कै. जनार्दन चौधरी, उत्तम बापु सोनवणे, सिताराम पाटील यांनी या परंपरेच्या जोपासनेत महत्त्वाची भूमिका बजावली.
यंदाही माजी जि. प. सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी वडिलांची परंपरा जोपासत उत्सवाचे नेतृत्व केले. यामध्ये दिनकर सोनवणे, तुकाराम सोनवणे, यशवंत बाविस्कर, सरपंच संदीप सोनवणे, उपसरपंच गोपाल चौधरी, राजेंद्र सोनवणे, लीलाधर सोनवणे, सुपडू सोनवणे, कीरण सोनवणे, सोपान सोनवणे, सुनील सोनवणे, मुकेश चौधरी, नामदेव चौधरी, मुरलीधर चौधरी, चिंतामण भिल, कैलास सपकाळे, पोलिस पाटील चेतन सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वढोदा गावातील नवरात्र महोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून गावातील एकात्मता, श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.







