
प्रतिनिधी सोनाली योगेश मोरे
लेखक संदीप राक्षे यांच्या भटकंती धरतीच्या स्वर्गाची या प्रवासवर्णन पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी पिंपरी येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या भव्य ऑडिटोरियममध्ये, महानायक, आंबी, झाडाझडती, पांगिरा, चंद्रमुखी, संभाजी या कादंबरीचे लेखक व ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पानिपतकार विश्वासजी पाटील, पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, आमदार जेष्ठ साहित्यिक राजनजी लाखे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदार अमित गोरखे, औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप पाचपांडे आणि यशस्वी गृपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी हे उपस्थित होते. संदीप राक्षे यांनी याआधी “वारसा शिल्पकलेचा”, “हेमलकसा एक रोमहर्षक सफर”, आणि “लेण्यांचा महाराष्ट्र” ही प्रवासवर्णन पुस्तके लिहिली असून, “भटकंती धरतीच्या स्वर्गाची” हे त्यांचे चौथे पुस्तक ठरले आहे. विशेष बाब म्हणजे, या सर्व पुस्तकांचे वितरण संदीप राक्षे वाचकांना विनामूल्य करतात. त्यांचा उद्देश वाचन संस्कृती रुजवणे, पर्यटनाला चालना देणे आणि अपरिचित ठिकाणांना वाचकांसमोर आणणे हा आहे. सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी “भटकंती धरतीच्या स्वर्गाची” या पुस्तकाचे विशेष कौतुक केले. पिंपरी चिंचवड मधील साहित्यिकांच्या बरोबरच औद्योगिक शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे भव्य आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेने केले होते..







