
यावल तालुका प्रतिनिधी
यावल तालुक्यातील दहिगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर येत असून, संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “कामे फक्त दिखाऊ पद्धतीने करून निधी उकळण्याचा प्रकार सुरू आहे” अशी जोरदार चर्चा तालुकाभर रंगू लागली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदाराने यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी कामे केली आहेत, त्या सर्व ठिकाणी निकृष्ट दर्जा आढळून आला आहे. कामे पूर्ण झाल्याचे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात ती अल्पावधीतच निकामी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. “थुंक लावून कामे” करण्याची पद्धत अवलंबून फक्त पैसे कमवण्यावर भर दिला जात असल्याचे नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत.
दहिगावमधील जलजीवन योजनेचे कामही याच पद्धतीने सुरू असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाईपलाईन, जलसाठा व इतर बांधकामांमध्ये निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, यामुळे भविष्यात पाणीपुरवठा योजनेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावल तालुक्यातील सुज्ञ नागरिकांकडून आता एकमुखाने मागणी केली जात आहे की, संबंधित ठेकेदाराने ज्या ज्या ठिकाणी कामे केली आहेत, त्या सर्व कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून शासनाचा निधी व जनतेचा विश्वास वाया जाऊ नये, अशी भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, तसेच चालू कामांवर देखरेख वाढवावी, अशी मागणीही जोर धरत आहे. अन्यथा येणाऱ्या काळात ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे.







