
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल : पवित्र रमजान महिन्यात उपवास (रोजा) धरणे हे मोठ्यांसाठीही संयम, श्रद्धा आणि आत्मनियंत्रणाची परीक्षा असते. मात्र यावल शहरातील अकसा नगर परिसरातील अवघ्या सहा वर्षांच्या बालकाने हा संकल्प पूर्ण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अकसा नगर येथील रहिवासी शेख नईमुद्दीन नाझिमुद्दीन शेख व डॉ आसेमा परवीन नईमुद्दीन शेख यांचा अवघा 6 वर्षांचा मुलगा नौफिल अली नईमुद्दीन शेख याने रमजान महिन्यात 5 वा व 26 वा रोजा असे सलग दोन रोजे पूर्ण करत कुटुंबासह परिसरातील नागरिकांचेही मन जिंकले. एवढ्या लहान वयात रोजा पूर्ण करण्याची जिद्द आणि श्रद्धा पाहून सर्वांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.
नौफिलने पहिल्यांदाच इतक्या उत्साहाने रोजा धरण्याचा निर्धार केला होता. दिवसभर संयम पाळत त्याने दोन्ही रोजे पूर्ण केले. त्याच्या या जिद्दीमुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईक व मित्रपरिवाराकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
धार्मिक संस्कार आणि श्रद्धा बालपणापासूनच जोपासली गेल्यास पुढील आयुष्यातही त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले. नौफिलच्या या प्रयत्नामुळे इतर मुलांनाही धार्मिक संस्कार व संयमाचे महत्त्व समजण्यास मदत होईल, असेही नागरिकांनी सांगितले.
अवघ्या सहा वर्षांच्या नौफिलने दाखवलेला हा निर्धार आणि श्रद्धा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. रमजानच्या पवित्र वातावरणात छोट्या वयात घेतलेला हा संकल्प परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.







