
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
जळगाव : कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कोरोना योद्ध्यांना आज रोजगारासाठी पुन्हा दरवाजे ठोठावण्याची वेळ आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे स्मार्ट कंपनीच्या ठेक्यात अनुभवी कामगारांना पुन्हा संधी देण्यात यावी, या मागणीसाठी कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीतर्फे आज दिनांक १४ मार्च २०२६ रोजी पाळधी येथील निवासस्थानी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले.
कोविड-१९ महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव, जळगाव शहर महापालिकेचे कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा शासकीय महिला रुग्णालय, मोहाडी येथे वर्ग-३ व वर्ग-४ पदांवर अनेक कंत्राटी कामगारांनी जीव धोक्यात घालून सेवा बजावली होती. त्या काळात या कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा, स्वच्छता आणि व्यवस्थापनाची मोठी जबाबदारी पार पाडली होती.
मात्र सध्या स्मार्ट कंपनीच्या ठेक्यात नवीन भरती करताना अनेक अनुभवी कोविड कंत्राटी कामगारांना डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे अनेक कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. काही ठिकाणी ओळखीच्या व वशिल्याबाजीच्या व्यक्तींना प्राधान्य देऊन भरती केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
यामुळे उर्वरित राहिलेल्या कोरोना योद्ध्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार स्मार्ट कंपनीच्या ठेक्यात रोजंदारी किंवा मासिक वेतनावर तातडीने रुजू करून घ्यावे, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. याबाबत योग्य ती दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.
स्मार्ट कंपनीच्या ठेक्यात रोजगार देण्याची मागणी करणाऱ्या कामगारांमध्ये निलेश जयराज बोरा, बबन गोकूळ सावळे, भूषण भास्करराव पाटील, विलास दगडू तायडे, कुणाल सुनिल विसपूते, कृष्णा शांताराम सावळे, विनोद बुधा सपकाळे, रविंद्र गोरख कोळी, सागर मोतिराम चौधरी, रमेश समाधान वानखेडे, जयेश रविंद्र वसाने, सागर रविंद्र बाविस्कर, सुनिल जुलालसिंग परदेशी, शब्बीर खान इब्राहीम खान, अजय विष्णू सैंदाणे, शिला उत्तम सपकाळे, ऐश्वर्या रामकृष्ण सपकाळे, प्रतिक्षा रविशेखर सोनवणे, सोना भगवान सुरवाडे, दिपाली सुरेश भालेराव, ललिता उमेश पवार, जितेंद्र देविदास वाणी, मयूर राजेंद्र मराठे, मयूर रविंद्र लोहार, सुमित नितीन पोलभूणे, गजेंद्र नारायण सोनार, प्रशांत बापू सोनवणे, युवराज दगडू रखमे आदींचा समावेश आहे.
कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या या योद्ध्यांना पुन्हा रोजगार मिळेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासन आणि स्मार्ट कंपनी याबाबत काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







