वाशिम, दि. 13 जुलै 2025: आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरम या पत्रकार संघटनेची वाशिम जिल्हा बैठक आज शासकीय विश्रामगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीसाठी जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे नियोजन अनिल तायडे यांनी केले असून, जिल्हा अध्यक्षा मोनाली गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
बैठकीत केंद्रीय सचिव प्रकाश सरदार यांनी संघटनेच्या उद्देशांबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्येक पत्रकाराची संघटनेतील जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी यावर त्यांनी प्रकाश टाकला.
तसेच, पत्रकारांनी समाजातील खऱ्या मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी निर्भीडपणे कार्य करावे, संघटना सदैव त्याच्या पाठीशी राहील,असे आवाहन त्यांनी केले. राज्य सचिव देवचंद्रा समदुर यांनी प्रस्ताविक सादर केले, तर राज्य संघटक पद्ममा मोहड यांनी संघटनेत महिलांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर दिला. महिलांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात अधिक सक्रिय व्हावे, यासाठी त्यांनी उपस्थितांना प्रोत्साहित केले.
दोन दिवसीय कार्यशाळेचा ठराव
बैठकीत पत्रकारांना प्रशिक्षित करण्यासाठी लवकरच दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. या कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकारांना आधुनिक पत्रकारितेचे तंत्र, तसेच सामाजिक मुद्द्यांवर प्रभावीपणे लेखन करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मान्यवरांचे मनोगत
या बैठकीत बुलढाणा जिल्हा सचिव रामेश्वर खरात आणि हिंगोली जिल्हा सचिव ॲड. उत्तम बलखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्यासाठी पत्रकारांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
उपस्थित मान्यवर
बैठकीला प्रा. डॉ. आबाराव वाघ, विनोद गणवीर, केशव इंगळे, अमोल मोरे,रोहित अवचार, सुकेशनी दनवे, सागर इंगळे, जया भालेराव, वनिता अंभोरे, ॲड. भिकाजी दाभाडे, गणेश कवड, सत्यप्रकाश भगत यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभार
बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल तायडे यांनी केले. त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत भविष्यातही अशा सकारात्मक उपक्रमांना गती देण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीमुळे आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरमच्या कार्याला अधिक बळकटी मिळाली असून, पत्रकारांना सामाजिक बदलासाठी प्रेरणा मिळाली आहे.