
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
उपकेंद्र शिरसाड अंतर्गत दगडी येथे अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया अभियान मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी व डॉ. स्वाती कवडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सिकलसेल आजाराबाबत तपासणी, निदान, उपचार, समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.
या अभियानांतर्गत एकूण ९८ लाभार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, नियमित औषधोपचाराचे महत्त्व तसेच आनुवंशिक आजाराबाबतची माहिती नागरिकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आसेमा परवीन, नईमुद्दीन शेख, आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ, तसेच आशा ताई रंजना कोळी, ज्योती मोरे, पूनम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. दगडी येथील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासणी करून घेतली व जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ग्रामीण व आदिवासी भागात सिकलसेल अॅनिमियाचे प्रमाण लक्षात घेता, अशा प्रकारचे उपक्रम आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून भविष्यातही सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
आरोग्य विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे दगडी परिसरात सिकलसेल आजाराविषयी जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली आहे.







