यावल प्रतिनिधी – मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यात २०२१ पासून अवैध धंद्यांना मिळालेली पोलीस प्रशासनाची मूक संमती अनेक कुटुंबांच्या उध्वस्ततेचे कारण ठरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गावोगावी सर्रासपणे चालणाऱ्या गावठी दारू, सट्टा-मटका आणि जुगार यांसारख्या धंद्यांमुळे युवकांचे भवितव्य अंधारात जात आहे.
२०२१ मध्ये कार्यरत असलेल्या काही पोलिस अधिकाऱ्यांनी कथितपणे हप्तेखोरी करत अवैध धंद्यांना संरक्षण दिले. त्यामध्ये काही निरीक्षक, उपनिरीक्षक व बिट अंमलदारांचा समावेश असल्याची नागरिकांत चर्चा आहे. या काळात जे कोणी विरोध करत होते, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून छळ करण्यात आला, असा आरोप आहे.
अवैध धंद्याविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर खोट्या गुन्ह्यांद्वारे दबाव आणल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अनेकांचा मानसिक छळ झाला असून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांचे स्वप्न उध्वस्त करण्यात आले.
गावठी दारूच्या विळख्यात अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. काही ठिकाणी घरोघरी पोटली दारू विक्री सुरू असून, महिलांच्या मोर्च्यानंतरही कारवाई केवळ कागदोपत्रीच राहिली आहे.
सध्या नियुक्त झालेले निरीक्षक धारबडे साहेब यांच्याकडून यावलकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. जळगाव कार्यकाळात त्यांनी जनतेसाठी न्याय दिला होता. त्यामुळे यावलमध्ये पुन्हा कायदा-सुव्यवस्थेला दिशा मिळेल, अशी आशा आहे.शासनाने या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. यावलमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा बंदोबस्त करून युवकांचे जीवन वाचवणे काळाची गरज बनली आहे.