
अहिल्यानगर |प्रशांत बाफना
तालुक्यातील रस्ते अपघातत बोकनवाडीत तरुणाच्या झालेल्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी, युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत मंगळवार ०६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन छेडले. शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन नगर कल्याण महामार्गावर सलग तीन तास सुरू होते. आंदोलकांनी थेट पारनेर तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी करत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर जोरदार टीका केली.
पारनेर तालुयातील मांडओहळ परिसरातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीमुळे पुन्हा एकदा निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे. गेल्या रविवार ०४ जानेवारी रोजी सकाळी सुमारे सात वाजता मांडओहळ नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणार्या भरधाव डंपरने बोकनकवाडी ते वासुंदे रोडवर दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात संतोष नर्हे (वय ३२, रा. बोकनकवाडी, ता. पारनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि परिसरात हळहळ व्यक्त झाली.
मांडओहळ परिसरात गेल्या काही वर्षांपासून अवैध वाळू उत्खनन आणि भरधाव डंपरांची बेधडक वाहतूक सुरू आहे. यामुळे वारंवार अपघात घडत असूनही महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या अवैध धंद्यात वाळू माफियांचा समावेश असून त्यांना प्रशासकीय पाठबळ मिळत असल्याची भावना परिसरात आहे. संतोष नर्हे यांचा मृत्यू हा अपघात नसून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेला खून असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी अनेक मागण्या जोरदारपणे मांडल्या. मांडओहळ परिसरातील अवैध वाळू उत्खनन तात्काळ बंद करावे, वाळू माफियांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, अपघातातील डंपर चालक आणि मालकावर हत्येचा गुन्हा दाखल करावा, तसेच महसूल आणि पोलीस विभागाने समन्वय साधून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय पारनेर तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवरही आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांनी तहसील कार्यालयात जाताना होणार्या अपमानास्पद वागणुकीबाबत आणि अरेरावी भाषेच्या वापराबाबत तक्रारी मांडल्या. तहसीलदार जनतेवर माज दाखवत असल्याचा आरोप करत त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली.
रस्ता रोको आंदोलनामुळे पारनेर ते साकूर मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. अनेक वाहने रांगेत उभी राहिली. मात्र आंदोलकांनी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केले. त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर करत वरिष्ठ अधिकार्यांकडे मागण्या पाठवण्याची विनंती केली. पोलीस आणि महसूल अधिकार्यांनी आंदोलकांशी चर्चा करून वरिष्ठांकडे मागण्या पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, अवैध वाळू वाहतुकीमुळे आणखी दुर्दैवी घटना घडल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील आणि यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल. परिसरातील नागरिकांनी एकजूट दाखवत अवैध वाळू धंद्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
यावेळी सुजित झावरे पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते कारभारी आहेर, शिवसेना नेते संदीप कपाळे, उद्योजक संदीप रोहकले, उपसरपंच माउली वरखडे, मारुती रोहकले, सरपंच विमल झावरे, सरपंच प्रकाश गाजरे, शंकर बर्वे, संतोष शेलार, भगवान वाळुंज, भाऊ सैद, दिलीप पाटोळे, पो. मा. झावरे, बाळासाहेब झावरे, शरद पाटील, महादू भालेकर, सूर्यभान भालेकर, विठ्ठल झावरे, बापूसाहेब गायखे, संतोष ढोकळे, चेअरमन शिवाजी रोकडे, सचिन सैद, संजय भोर, पप्पू कासुटे, इंजि प्रसाद झावरे, इंजि. निखील झावरे, स्वप्निल झावरे, गणेश शिरतार, मनोज झावरे, अशोक भालेकर, संतोष भालेकर, अभिनव पाटोळे, संग्राम झावरे, अशोक पाटोळे, संतोष दाते, कैलास भालेकर, साहेबराव गुंजाळ, लक्ष्मण झावरे, नारायण झावरे, किरण पोपळघट, कुलदीप शिरतार, महेश झावरे, पांडुरंग आहेर, भास्कर शिंदे, संकेत झावरे, दत्तात्रय जगदाळे, आदी यावेळी उपस्थित होते.
पारनेर तहसीलदार जनतेचे सेवक असले पाहिजेत, मात्र ते माज दाखवत आहेत. वयोवृद्ध नागरिकांशी अरेरावी करणे आणि अपमानास्पद वागणूक देणे लोकशाहीत खपवून घेतले जाणार नाही. अशा अधिकार्यांचे तात्काळ निलंबन झाले पाहिजे, अन्यथा आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुजित झावरे पाटील यांनी दिला.
तस्करांना पाठीशी घालणारेच आंदोलनात
टाकळी ढोकेश्वर आणि परिसरातील वाळू तस्करांना आतापर्यंत ज्यांनी पाठीशी घातले, त्यांच्याकडून हप्ते वसूल केले तीच नेते मंडळी वाळू तस्करांना आवरा अशी मागणी करत सामान्य नागरिकांना आणि वाहन धारकांना वेठीस धरत असल्याची कुजबुज आंदोलनस्थळी होत होती. वाळू तस्करांना गेल्या अनेक वर्षांपासून पाठबळ देताना हेच वाळू तस्कर डोईजड झाल्याचे पाहून आंदोलन करण्यात आल्याची चर्चाही रंगली.
मांडओहळ परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि भरधाव डंपरांची बेधडक वाहतूक नागरिकांच्या जीवावर उठली आहे. नियमबाह्य उत्खननामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. हे अपघात नव्हेत, तर सरळ खून आहेत. याला जबाबदार गुन्हेगार आणि अधिकारी मोकाट फिरत आहेत. प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी.
टाकळी ढोकेश्वर येथील रस्ता रोको ही फक्त सुरुवात आहे. जनतेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील. अवैध वाळू धंदा बंद करा, दोषींना शिक्षा करा आणि तहसीलदारांची अरेरावी थांबवा. प्रशासनाने जनतेच्या भावना समजून घेऊन ठोस पावले उचलली नाहीत तर मोठे आंदोलन अटळ आहे







