
सुपा टोलनाक्यावर पोलिसांवर हल्ला, आरोपी विश्वजित कासार ला सक्त मजुरीची शिक्षाअहिल्यानगर/प्रशांत बाफना – सरकारी कामात अडथळा आणून पोलीस अंमलदारांवर हल्ला केल्याप्रकरणी आरोपीला सहा महिने सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश डॉ. यु. जे. मोरे यांनी भा.दं. वि. कलम ३५३ अन्वये हा निकाल दिला. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अँड. मंगेश दिवाणे व अँड. अनिल घोडके यांनी कामकाज पाहिले. विश्वजीत रमेश कासार (वय ३२, रा. वाळकी, ता. अहिल्यानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
१५ फेब्रुवारी २०२० रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघ यांना फसवणूकीच्या गुन्ह्यातील पसार संशयित आरोपी पुण्याकडून नगरकडे येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अंमलदार प्रमोद लहारे व शाहीद शेख यांना सापळा रचण्याचे आदेश देण्यात आले. मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी सुपा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी सुपा टोलनाक्याजवळ सापळा लावला.
रात्री सुमारे ८.२५ वाजता नगरकडून पुण्याच्या दिशेने जाणारी विना नंबरची कार आढळून आली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा करत पोलीस असल्याची ओळख सांगितली असता संशयित आरोपीने काच खाली करून पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच पोलिसांच्या तोंडावर व हातावर मारहाण करून दुखापत केली आणि वेगात वाहन घेऊन पुण्याच्या दिशेने पळ काढला.
यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी अंमलदार लहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी या गुन्ह्याचा तपास केला. सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. तसेच सुपा टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुरावे. न्यायालयासमोर सादर करण्यात आले. हे पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी संजय चव्हाण, अंमलदार आर. डी. आडसुळ, सारिका रोकडे यांनी सहकार्य केले







