
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
दिनांक २४ डिसेंबर २०२५, बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महेलखेडी (ता. यावल) येथे ‘बाल आनंद मेळावा’ अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शाळेतील रंगीबेरंगी वातावरण यामुळे संपूर्ण परिसर आनंदाने फुलून गेला.
या मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. युनूस तडवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिक, सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. पालकांनी या स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांच्या आनंदात मनापासून सहभाग नोंदवला.
विशेष बाब म्हणजे, विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी यांसारख्या मूलभूत संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारातून शिकवण्यात आल्या, त्यामुळे शिक्षण अधिक सुलभ, प्रभावी व आनंददायी झाले.
मेळाव्यात लावलेला सेल्फी पॉइंट विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांसोबत फोटो काढून हा आनंददायी क्षण कायमस्वरूपी जपला.
संपूर्ण कार्यक्रमात आनंद, उत्साह, शिक्षण व सहभाग यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. सर्वांच्या सहकार्याने आणि सकारात्मक वातावरणात बाल आनंद मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती.
हा मेळावा केवळ एक कार्यक्रम न राहता, ‘खेळातून शिक्षण आणि शिक्षणातून आनंद’ या संकल्पनेचा जिवंत अनुभव ठरला, असे ग्रामस्थ व पालकांनी आवर्जून सांगितले.







