
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
बेथलं स्कूलमध्ये आज दिनांक २३ डिसेंबर रोजी वार्षिक समारोह दिन व ख्रिसमस सण अतिशय आनंदी, भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचा संपूर्ण परिसर ख्रिसमसच्या रंगात न्हाऊन निघाला होता.
कार्यक्रमाची सुरुवात होताच सिनियर के.जी. व जुनिअर के.जी.च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शानदार नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांच्या निरागस हालचाली, रंगीबेरंगी पोशाख व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने पालकांसह पाहुणे मंत्रमुग्ध झाले.
यावेळी प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. प्रभू येशू यांच्या जन्माशी संबंधित देखावे, संदेशात्मक सादरीकरण व आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. विशेष म्हणजे मंडप उभारून शाळेला बेथलेहेम नगरीच्या धर्तीवर भव्य व सुंदर सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे उपस्थितांना जणू त्या पवित्र नगरीत आल्याचा अनुभव मिळाला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या भावना व्यक्त करत बेथलं स्कूल व येथील शिक्षकवर्गाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जाणारे संस्कार तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले.
या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ. वर्षा आकाश चोपडे उपस्थित होत्या. यावेळी सौ. पूजा जयंत चोपडे, शारदा महाजन, योगेश चौधरी तसेच अनेक मान्यवर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिस एनी मॅथ्यू, मॅडम जस्टिना मॅथ्यू, मॅडम सुजन मॅथ्यू, मॅडम रंजना चौधरी, मॅडम दिव्या पंडित, मॅडम निशा राणे व मॅडम नितू सोनावणे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
बेथलं स्कूलचा हा वार्षिक समारोह व ख्रिसमस उत्सव विद्यार्थ्यांच्या कला, संस्कार व संस्कृतीचे दर्शन घडवणारा अविस्मरणीय सोहळा ठरला, अशी भावना उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आली.







