
अहिल्यानगर । प्रशांत बाफना
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निकालानंतर महायुतीला मोठे यश मिळाले, तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र काँग्रेसला काही प्रमाणात चांगले निकाल मिळाले आहेत.
दरम्यान, निवडणुकीतील पराभवावरून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जामखेड नगरपरिषद निकालानंतर काँग्रेसवर गंभीर आरोप केले, आणि भाजपच्या उमेदवाराला काँग्रेसने तिकीट दिल्याचा दावा करत काँग्रेसला ‘भाजपची बी टीम’ म्हटले.
त्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी रोहित पवारांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला नसल्यामुळे हा पराभव झाल्याचा आरोप केला. महायुतीकडून प्रचंड प्रचार झाला हेलिकॉप्टरमधून येणे-जाणे, बॅगा उतरतानाही दिसल्या. आमच्याकडे ना हेलिकॉप्टर ना विमान, तरीही नागरिकांनी आमच्या कामावर आणि विश्वासावर मतदान केले,असे थोरात यांनी सांगितले.
थोरात यांनी पुढे सांगितले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली होती. मी त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे, सर्वांना सोबत घेऊन निर्णय घेण्याचे सांगितले, परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे नमूद केले.







